नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध हे सामायिक वारसा, सामायिक वर्तमान आणि सामायिक भविष्य यावर आधारित आहेत, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

अश्विनी वैष्णव आणि बांगलादेशचे रेल्वे मंत्री मोहम्मद नुरुल इस्लाम सुजॉन यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून नवीन जलपाईगुडी आणि ढाका दरम्यान धावणाऱ्या मिताली एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर ते बोलत होते. दोन्ही देशांमधे सर्व स्तरावर असलेल्या प्रेमळ मैत्रीमुळे आज दोन्ही देशांच्या विकासाला वेग आला आहे. मिताली एक्सप्रेस हे मैत्रीबंध आणखी बंध दृढ करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असंही वैष्णव म्हणाले.

मिताली एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे दोन शेजारी देशांमधील व्यापार आणि प्रवासाचे संबंध अधिक समृद्ध होतील, सुलभता आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल, अशी प्रतिक्रिया बांग्लादेशाच्या रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली. ही रेल्वे चिलाहाटी-हल्दीबारी ते न्यू जलपाईगुडी असं एकूण ५१३ किमीचं अंतर पार करेल. ढाका-जलपाईगुडी मिताली एक्सप्रेस ही बांगलादेश आणि भारत यांच्यातली तिसरी प्रवासी रेल्वे सेवा आहे.