नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार केली आहे.

सध्या बाजारात असलेल्या ज्या मॉडेल्सच्या गाड्यांचं 31 ऑगस्ट 2021 नंतर उत्पादन होणार आहे, किंवा नव्यानं येणाऱ्या ज्या मॉडेल्सच्या गाड्यांचं 1 एप्रिलनंतर उत्पादन होणार आहे, त्यांच्यामध्ये ही एअरबॅग असणं अनिवार्य आहे, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. मोठे अपघात झाल्यास पुढे चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीला मोठा धोका असतो.

त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षाविषयक समितीनंही या एअर बॅग्जसंदर्भात सूचना केली होती.