पुणे : सामाजिक न्याय विभाग हा तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणारा विभाग असून विद्यार्थी हिताला प्राधान्य देत प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे प्रकरणे तात्काळ मार्गे लावून विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार हाती घेतला नंतर, पुणे येथे विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाचा आढावा घेण्यात आला यामध्ये मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, वसतिगृह, स्वाधार योजना, निवासी शाळा, यांची प्रवेश प्रकीया याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात शिष्यवृत्तीच्या संदर्भात तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारीचा निपटारा करण्याच्या अनुंषगाने आज बैठकीत निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या त्वरीत निकाली काढून त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीस राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग, अविनाश महातेकर, समाज कल्याण आयुक्त मिलीन्द शंभरकर (भा.प्र.से) , बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, (भा,पो,से) , अतिरिक्त आयुक्त भिमराव खंडाते, सह आयुक्त माधव वैद्य , प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उपायुक्त रविंद्र कदमपाटील, तसेच पुणे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचून लाभार्थ्यांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करण्यासाठी यंत्रणेने काम करावे असे निर्देश यावेळी दिले.

शासनाने समाजातील वंचित घटकासाठी विविध लोकउपयोगी योजना राबविल्या आहेत. या वंचित घटकाच्या विकासासाठी शासन कटीबध्द असून दादासाहेब गायवकवाड सबळीकरण योजना , मिनी ट्रक्टर योजना, स्वाधार योजना, घरकुल योजना, अशा योजनाची प्रभावीपणे अमंलबजावणी करत आहेत. पुढील काळात या योजनासाठी शासना स्तरावरून निधी कमी पडु दिला जाणार नाही असे डॉ.खाडे यांनी स्पष्ट केले.