बारामती : महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौऱ्यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ‍ ‍उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील तसेच शासकीय यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी दृकश्राव्यमाध्यमाद्वारे बारामती तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,खरीप अनुदान वाटप सन २०१८-१९, DSP MIS अहवाल, ई-पिक पाहणी, बारामती तालुक्यातील शेतकरी आत्महत्या बाबतची ‍ माहिती,मागील ५ वर्षातील मंडलनिहाय सरासरी पर्जन्यमान, सध्या सुरु असलेल्या चारा छावण्या, पाणी टँकर खेपांची माहिती, जानाई-शिरसाई योजनेंतर्गत होणा-या पाणीपुरवठा,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना,जलयुक्त शिवार, पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना आदी योजनांबाबत तालुक्यातील सद्यस्थितीची ‍ माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री यांनी महत्वाच्या शासकीय यंत्रणांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी थांबून नागरिकांच्या अडी अडचणींचा तात्काळ निपटारा करावा, तसेच विभागप्रमुखांनी कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविण्याकरीता त्यांना आवश्यक ते ‍ प्रशिक्षण द्यावे, नागरीकांच्या गरजांप्रमाणे त्यांची कामे वेळेवर करावीत, तसेच ज्या विभागांना निधीची आवश्यकता आहे त्यांनी अंदाजपत्रकासह अहवाल तात्काळ मंजुरीकरीता पाठवावेत अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम, महावितरण,पोलीस,भूमी अभिलेख,वैद्यकीय विभाग, नोंदणी विभाग आदी विभागांच्या कामकाजाविषयी माहिती घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.