नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल ही घोषणा केली. मुंबईतल्या विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचं उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचं पुन:लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही ते म्हणाले.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. इयत्ता दहावी परीक्षेच्या निकाला अगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं राबवली जात आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे.असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. हे अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.