नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. परदेशातून मदत म्हणून मिळालेली आणखी ३ लाख सुट येत्या ४ एप्रिलला मिळतील अशी माहितीही मंत्रालयानं दिली आहे.
सध्या ११ स्थानिक उत्पादक अशा सुटची निर्मिती करत असून, २१ लाख सुट तयार करायला सांगितले आहेत असंही मंत्रालयानं कळवलं आहे. या उत्पादकांकडून सध्या दरदिवशी ६ ते ७ हजार सुट मिळत असून, एप्रिलच्या मध्यापर्यंत ही क्षमता १५ हजारांपर्यंत वाढेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
याशिवाय या सुटच्या निर्मितीसाठी आज आणखी एक स्थानिक उत्पादक पात्र ठरला असून, त्याला ५ लाख सुटची निर्मिती करायला सांगितलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.