नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्ण करत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. नवी दिल्लीच्या दूरदर्शन भवनात वृत्तविभागातर्फे आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. गेल्या ८ वर्षात विविध विकास आणि कल्याणकारी योजनांमार्फत सरकारने १२ कोटी शौचालयांचं बांधकाम, ग्रामीण भागात ४७ टक्के लोकसंख्येला नळाने पाणीपुरवठा, सुमारे साडेनऊ कोटी गॅस जोडण्या, आणि ३ कोटी पक्की घरं ही सरकारची कामगिरी आहे असं ते म्हणाले.

गेल्या आठ वर्षात सरकारने विविध क्षेत्रात राबवलेल्या योजनांचा आणि आपत्कालीन उपायांचा उल्लेख त्यंनी केला. “मोदी सरकारची आठ वर्षं – सत्यात उतरलेली स्वप्नं किती?” या विषयावर हा परिसंवाद आयोजित केला आहे. विरोधी पक्ष सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, क्रीडा क्षेत्रातले मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिशेखर वेंपती, दूरदर्शनचे महासंचालक मयंक अग्रवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.