नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २६ आणि २७ मार्च रोजी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी बांगलादेशला भेट देणार आहेत. वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
नुकताच भारतातर्फे देण्यात येणारा गांधी शांतता पुरस्कार रहेमान यांना जाहीर झाला आहे. भारत–बांगलादेश दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरेल, असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. या दौऱ्यात सुरक्षा, आर्थिक भागीदारी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण अपेक्षित आहे.