नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी ‘विझिट नेपाळ ईयर २०२०’ या मोहिमेचा काल काठमांडूमध्ये ऐतिहासिक दशरथ रंगशाळा इथं एका दिमाखदार सोहळ्यात प्रारंभ केला.

भारताचे पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह नेपाळचे माजी प्रधानमंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. नेपाळमधल्या पर्यटनाला चालना देणं आणि या वर्षी वीस लाख पर्यटकांना आकर्षित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यात प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत आणि युवकांमधला उत्साह आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास प्रल्हाद सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.