नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत नरसंहाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आक्रमण-शैलीतली शस्त्रं आणि उच्च क्षमतेच्या बंदुकांच्या मॅगझिनवर बंदी घालणं गरजेचं असल्याचं मत अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलं आहे. ते काल व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला संबोधित करत होते.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या प्राथमिक शाळेत लहान मुलांवर एका माथेफिरूनं गोळीबार केला, त्यात १९ लहान मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बायडन काल राष्ट्राला संदेश देत होते. ते पुढे म्हणाले, जर संसदेला शस्त्रं बेकायदेशीर ठरवता येत नसतील, तर निदान शस्त्र खरेदी करण्याचं वय १८ वरून २१ पर्यंत वाढवायला हवं. असं ते म्हणाले. धोकादायक समजल्या जाणार्या कोणत्याही व्यक्ती कडून शस्त्रं काढून घेण्याची परवानगी देणाऱ्या कायद्याची व्याप्ती वाढवली पाहिजे असंही ते म्हणाले.