नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसन्न व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चारांनी दूरदर्शनच्या बातम्या गावागावात पोहोचणारे ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. संध्याकाळी अंधेरीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून आजारपणामुळं ते घरीच होते. ३५ वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर त्यांनी केलेलं निवेदन आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यापूर्वी ते काही काळ निर्मिती सहायक म्हणूनही दूरदर्शनवर कार्यरत होते.
याशिवाय आकाशवाणीवरही विशेष कार्यक्रमांच्या निवेदनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या आवाजातल्या जाहिराती अनेक जनमानसाच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेल्या.मराठी विश्वकोशातल्या अनेक नोंदीसारख्या काही महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले आहेत. अनेक माहितीपटांनाही त्यांनी आवाज दिला होता. दूरदर्शन, आकाशवाणी, जाहिरात क्षेत्रात त्यांचं नाव झालं तरी रंगभूमी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. रत्नाकर मतकरी यांच्या आरण्यक आणि विश्वास मेहेंदळे यांच्या पंडित, आता तरी शहाणे व्हा यासारख्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या. एका वृत्तपत्रात ते नाट्य समीक्षणही लिहायचे. भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे दूरदर्शनच्या बातम्यांची ओळख बनलेल्या भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात एक खास प्रतिमा तयार केली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
भिडे यांच्या जाण्यानं दूरदर्शन बातम्यांचा बुलंद मराठी आवाज हरपला आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.माजी माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अतिशय लोभस आणि राजबिंडं व्यक्तीमत्तव असलेले प्रदीप भिडे खास आवाज आणि लकबीमुळं कायम लक्षात राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.