नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळं या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. देशातल्या बहुतांश भागात सट्टेबाजी आणि जुगार बेकायदा आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रामुख्यानं युवक आणि मुलांना आर्थिक आणि सामाजिक- आर्थिक फटका बसण्याचा धाेका असल्याचं या सूचनापत्रात म्हटलं आहे.

या जाहिराती बंदी असलेल्या सट्टेबाजीला प्रवृत्त करत असून दिशाभूल करणाऱ्या आहेत. ग्राहक संरक्षण कायदा तसंच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रकारांसाठीच्या जाहिरात आचारसंहिता आणि नियमांनुसार अशा प्रकारच्या जाहिराती प्रसारीत करण्याला अटकाव आहे. ४ डिसेंबर २०२० रोजी या मंत्रालयानं खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भारतीय जाहिरात मानक परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रसारित कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले होते.