मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिलं आहे. शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाली आहेत. उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात गेल्या अडीच वर्षात १ हजार ७५० पूर्णांक ६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७ पूर्णांक १३ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्यं आणि ८५ पूर्णांक ८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवते. या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनांचं क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे लोणार ला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.