नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह म्हणाले. काल, सर्वोच्च न्यायालयानं झाकिया जाफरी यांची २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर अनेकांना विशेष तपास पथकानं दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं या याचिकेत तथ्य नसल्याचंही नमूद केलं.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले की, गोध्रा इथं रेल्वेगाडी जळित कांडानंतरची दंगल पूर्वनियोजित नसून स्वयंप्रेरित होती. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व काही करण्यात आल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्यात आली होती, लष्कराला पाचारण करण्यात काहीही दिरंगाई झाली नव्हती असंही शाह म्हणाले.