नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तिथल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलैला निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करतील. १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी २० जुलैला होईल. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्टला  सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होईल.