नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर १५ रुपयांनी तात्काळ कमी करावेत असे  निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. तसंच खाद्य तेलाच्या दरातली कपात सर्वत्र लागू व्हावी यासाठी तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपन्यांनी वितरकांसाठीचे दर देखील तात्काळ कमी करावेत असे निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं ६ जुलै रोजी खाद्य तेल संघटनांबरोबर  झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले. आयात केल्या जाणाऱ्या खाद्य तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कमी असून ही गोष्ट सकारात्मक असल्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. खाद्य तेलाच्या दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचायला हवा, तसंच  ज्या कंपन्यांचे  तेलाचे दर अन्य कंपन्यांपेक्षा जास्त आहेत,  त्यांना देखील दर कपातीचे निर्देश देण्यात आल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.