नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या सरकारी वृत्त वाहिनीनं जाहीर केलं आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतात उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. आबे यांच्या निधनामुळं संपूर्ण मानव जातीचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे. भारत-जपान संबंध दृढ करण्यात आबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. शिंझो आबे यांच्या निधनामुळं मोठा धक्का बसला असल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्था आणि जागतिक संबंधांबाबत त्यांना असलेली समज कायम लक्षात राहील, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारत आणि जपानमधले संबंध विशेष पातळीवर घेऊन जाण्यात आबे यांची महत्त्वाची भूमिका होती. जपानसह संपूर्ण जगाला उत्कृष्ट बनविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. आबे यांच्या मृत्यूमुळं भारतानं एक चांगला मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. आबे यांच्या निधनाबद्दल माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.