मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या तिन्ही विभागांमधे बहुतांश ठिकाणी, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.

पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमधे १२ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या समाधानकारक पाऊस पडतो आहे. गेल्या २४ तलावांत मुसळधार पाऊस पडल्यानं तलावांत एका दिवसात तब्बल ९७ हजार ६०७ दशलक्ष लिटर, म्हणजे २५ दिवसांच्या पाणी साठ्याची वाढ झाली आहे. सध्या सात तलावांमधे मिळून एकूण ५ लाख १५ हजार ७३६ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा असून, हा पाणीसाठा पुढचे १३३ दिवस म्हणजे १९ नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईत दरड कोसळून दोन जण जखमी झाले.

ठाणे जिल्ह्यात शहापूरमधे दोन, तर मुरबाड, अंबरनाथ आणि ठाणे इथं प्रत्येकी एकाचा पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यात सकाळपासून चांगला पाऊस सुरु असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात एकजण जखमी झाला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकजण जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी विसर्ग सुरु असल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी ३२ फुटाच्या वर गेली आहे. कृष्णा नदी क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून ५ हजारानं क्युसेक विसर्ग वाढला असून, ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कर्नाटकात सुरू आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं मंदिराच्या आवारात पाणी आल्यानं काल रात्री दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं आज अहेरी तालुक्यात वेलगूर इथं माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली. यामुळे कुठलीही प्राणहानी झाली नाही. मात्र, हजारो मासे तलावाबाहेर गेल्याने मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १७१ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात १२६ पूर्णांक ६ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोलीसह अन्य भागातही आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती.

धुळे जिल्ह्यासह धुळे शहरात पावसानं झडी लावली आहे. काल रात्रीपासून धुळ्यात संततधार पाऊस सुरु आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, पिंपळनेर, निजामपुर, दहिवेल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे साक्री तालुक्यातल्या नदी नाल्यांमधे मोठ्या प्रमाणात पाणी वाढलं आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्प धरण आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं प्रकल्पाची पाणीपातळी सतत वाढत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्यानं पांझरा नदीच्या काठावरच्या गावांमधल्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.