नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार्ल्स मायकल यांनी यूरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मायकल यांच्या नेतृत्वात भारत आणि यूरोपीय संघामधली भागीदारी अधिक मजबूत होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. मायकल आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करतील अशा शुभेच्छाही मोदी यांनी दिल्या आहेत.

मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान मायकल यांच्यासोबत झालेल्या भेटीचा संदर्भ देत, भारत बहुआयामी व्यापार आणि गुंतवणूक करार, दळणवळसंदर्भातली भागीदारी, दहशतवादविरोध तसंच हवामानबदल या आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर युरोपीय संघासोबत पुढची वाटचाल करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.