मुंबई (वृत्तसंस्था) : अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र ज्येष्ठांच्या मार्गदर्शक सूचना असून, त्याद्वारे सरकारवर कुठलाही दबाव टाकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न नाही, असं काँग्रेसच्या अनुसुचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते.

काँग्रेसचा सोशल अजेंडा राबवण्यासाठी महाविकास आघाडीला सोनिया गांधी यांनी १४ डिसेंबर रोजी एका पत्राद्वारे चुतु:सुत्री सूचना केल्या होत्या. त्यात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधीच वितरण, शासकीय कंत्राट, प्रकल्प उद्योग-धंद्यात प्राधान्य देणं, शासकीय नोकरीतला अनुशेष कालबद्ध कार्यक्रम राबवून दूर करणं, शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीच्या १३ महिन्याच्या कारकिर्दीत आठ ते नऊ महिने हे करोना संसर्गामुळे विकास कामांची थोडी गती मंदावली होती. परंतु आता स्थिती पूर्ववत झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी या सूचना राज्य सरकारला मार्गदर्शक ठरतील, असं राऊत म्हणाले.