मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तसंच विदर्भात मुसळधार पाऊस पडला. दमदार पावसामुळे राज्यातली धरणं भरली आहेत, नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही जिल्ह्यांमधल्या शाळा आणि महाविद्यालयं आज बंद राहिली. मुंबईत आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रेल्वे सेवा सुरळीत सुरु आहे.
नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात देखील आज पावसाचा जोर ओसरला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडत असून तेलंगणा राज्यातल्या मेडीगड्डा धरणाचं पाणी सोडल्यानं गोदावरी नदीचं पाणी सिरोंचा तालुक्यातल्या नदीकाठावरच्या गावांमध्ये शिरलं आहे. नगरम,सूर्यापल्ली, पेंटीपाका या गावांमधली घरं पाण्याखाली बुडाली आहेत. भंडारा जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असून लाखनी तालुक्यातल्या वाकल आणि मरेगाव या गावांना वादळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसात ५० पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं तर अनेक झाडं आणि विजेचे खांब कोलमडून पडले. या गावांमधला वीजपुरवठा अद्याप खंडित आहे.
वाशिम जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेतांमध्ये पावसाचं पाणी जमा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं रक्षण करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबिन आणि तूर या पिकात ७२ तासांपेक्षा जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे.
धुळे जिल्ह्यात गेले काही दिवस दमदार पाऊस पडत असून जिल्ह्यातले मध्यम आणि लघू जलप्रकल्प पुर्ण क्षमतेनं भरले आहेत. अक्कलपाडा, जामखेली, लाटीपाडा ही धरणं भरल्यानं पांझरा, कान, जामखेली या नद्यांना पूर आले आहेत. अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिंदखेडा तालुक्यातल्या बुराई नदीवरच्या बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं हा प्रकल्प ९९ टक्क्यापेक्षा जास्त भरला आहे. त्यामुळे बुराई नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात आज सकाळ पासून पावसानं विश्रांती घेतली आहे. नांदेड शहरामध्ये विष्णुपुरी प्रकल्पाकडून येणारा पुराच्या पाण्याचा ओघ कमी झाला असून विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आज दुपारपासून धरणाच्या चार दरवाजांमधून ३७ हजार ८५७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे. कंधार तालुक्यातल्या मनार ऊर्ध्व प्रकल्पाच्या दोन दरवाजांमधून २ हजार ७५५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग मन्याड नदीत सुरु आहे. ईसापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, धरण ६५ टक्क्याहून अधिक भरलं आहे. अकोला जिल्ह्यात आज संध्याकाळी पावसानं विश्रांती घेतली आहे.