नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण ८ पदकांची कमाई केली आहे. आज दहा मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुता, शाहू तुषार माने, आणि पार्थ मखेजा या त्रिकुटांना दक्षिण कोरियाच्या संघावर १७-५ नं मात करत देशाला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं, तर याच प्रकारात महिलांमधे एलावेनी वलावीरन, मेहुली घोष आणि रमिता यांनी रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारतीय संघानं इटलीच्या अनुभवी संघाशी चुरशीची लढत दिली. त्यांना १५-१७ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं. याच प्रकारात महिला संघानं कोरियाच्या दर्जेदार संघाचा सामना करत रौप्य पदक मिळवलं.