तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला, ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी दिली. तळेगावात आयोजित एका बैठकीत म्हाळस्कर यांनी हा पाठिंबा जाहीर केला. शेळकेंना मिळालेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष योगेश हुलावळे, पंकज गदिया, संग्राम भानुसघरे, संजय शिंदे, तानाजी तोडकर, संतोष गोंधळे, अनिल वरघडे, राहुल  मांजरेकर, भारत चिकणे, जॉर्ज मोझेस दास, कुणाल पतंगे, गणेश भागरे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनसे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर म्हणाले की, सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी स्वच्छ मानाने काम केले आहे. त्यामुळेच जनतेपर्यंत हे काम पोहोचले. त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुकाची थाप देण्यासाठी मनसे त्यांच्या पाठीशी उभी आहे. तालुक्यातील जनता अण्णांना नक्की न्याय देणार आणि विधानसभेत पाठवणार, असा विश्वास म्हाळस्कर यांनी व्यक्त केला. सुनिल शेळके अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते असून मावळ तालुक्याच्या विकासात त्यांचे भरीव योगदान आहे. गेल्या ४ वर्षांपासून त्यांचे काम आम्ही पाहतो. अण्णा चुकीच्या पक्षात होते. तालुक्याच्या विकासासाठीच शेवटच्या क्षणी शेळके यांनी योग्य निर्णय घेतला. नवलाख उंब्रे येथे त्यांनी रस्त्याचे काम स्वखर्चाने केले, ही महत्त्वाची बाब आहे. योग्य निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करणाऱ्या शेळकेंना आमचा मनापासून पाठिंबा आहे, अशी भावना योगेश हुलावळे यांनी व्यक्त केली.
मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुनिल शेळके यांना मनसेकडून जाहीर  पात्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्रथम सुनिल अण्णांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.  हा पाठिंबा बिनशर्त आहे, हेच महत्त्वाचे आहे, असे नमूद करून पुढे ते म्हणाले की, मनसेला सोबत घेऊन काम करतांना आमची ताकद दुपटीने वाढणार आहे. यापुढे मनसेबरोबर विचार-विनिमय करूनच तालुक्यासंदर्भात निर्णय घेतले जातील. यापुढे मनसेला या तालुक्यात झुकते माप देऊ, असेही शेळके म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले कि, सुनिल शेळकेंना सर्व मित्र पक्षांचे सहकार्य आहे. आता मनसेही सोबत आल्यामुळे आम्ही दुप्पट जोमात काम करू. शेळकेंची उमेदवारी ही मावळवासीयांच्या मनातली उमेदवारी आहे. पक्षभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू, आणि मावळात इतिहास घडवू, असा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.