मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर हल्ल्याच्या धमकीचा  प्राप्त झालेला संदेश पोलिसांनी गांभीर्याने घेतल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबई पोलीस आयुक्तालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्रथमदर्शनी हा संदेश पाकिस्तानातून आल्याचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षितते साठी पोलीस दल सदैव दक्ष असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण कोणतीही शक्यता फेटाळत नसून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

२६/११ सारखेच दहशतवादी हल्ले मुंबईवर केले जातील असा धमकीचा संदेश प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूनीवर फणसळकर यांनी आयोजित वार्ताहर  परिषदेत ही माहिती दिली आहे. याबाबतचा प्रथम माहिती अहवाल वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत असून त्यानंतर मुंबई पोलिसांचा गुन्हे विभाग या प्रकरणाची त्वरित चौकशी सुरू करेल असं फणसळकर यांनी सांगितलं.  मुंबई पोलीस दलाला हाय अलर्टचे आदेश दिले असून सागर कवच मोहीमही सुरू केली असल्याची माहिती फणसळकर यांनी यावेळी दिली.  सागरी सुरक्षेबाबत किनारपट्टी दक्षता विभागा बरोबर मुंबई पोलिसांचा योग्य समन्वय असल्याचं  त्यांनी यावेळी सांगितलं.