नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कठोर कोविड निर्बंधांमुळे चीनी विद्यापीठांमध्ये परत जाण्यासाठी दोन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना चीन कडून व्हिसा मिळणार आहे, असं नवी दिल्लीतील चिनी दूतावासानं वेबसाइटवर काल जाहीर केलं. अद्ययावत व्हिसा वाटप प्रक्रिया उद्यापासून सुरु होईल जी विविध श्रेणीतील भारतीय प्रवाशांना आणि चीनमधे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना लागू होईल. मात्र, अद्याप टुरिस्ट व्हिसाला परवानगी नाही. X1-व्हिसा, उच्च शैक्षणिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जारी केला जाईल.  नवीन विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठानं जारी केलेले मूळ प्रवेश पत्र सादर करणं आवश्यक असून, जुन्या विद्यार्थ्यांना चीनच्या विद्यापीठानं कॅम्पसमध्ये परतण्यासाठी जारी केलेलं प्रमाणपत्र दाखवणं आवश्यक आहे.