मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साजरा करावा असं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गणेश मंडळ आणि नागरिकांना केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते.
उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या सुलभरित्या देण्यात येणार असून, तहसीलनिहाय मदत कक्षाद्वारे मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी जारी केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी देशभक्तीपर देखाव्यांना प्राधान्य द्यावं असं ते म्हणाले. तालुकास्तरावरच्या स्पर्धेतून जिल्हास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.