नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या सहाव्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते.

सरकार कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असून कोविड साथीच्या काळात कृषी क्षेत्रानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी त्यांनी उद्घाटन केलेल्या कृषी चाणक्य इमारतीचा संदर्भ देत अशा सुविधा कृषी क्षेत्रातील स्टार्ट-अपला चालना देतील, असा विश्वास तोमर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली. नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आलं तर तीन माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.