नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युरोपला पाईपलाईनद्वारे केला जाणारा वायूपुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला आहे.रशियातील सरकारी मालकीची उर्जा कंपनी गॅझप्रॉम दिलेल्या माहितीनुसार नॉर्ड स्ट्रीम १ वायुवाहिनीवर पुढील तीन दिवसांसाठी निर्बंध लावले आहेत.
रशियाने युद्धासाठी उर्जेचा वापर केल्याचा आरोप युरोपिय देशांच्या सरकारांनी केला आहे. मात्र मॉस्कोकडून या आरोपांचा इन्कार करण्यात आला असून तांत्रिक कारणामुळे पुरवठा थांबवल्याचे कारण दिले आहे. कपात करण्यापुर्वी रशियाचा वाटा वायू पुरवठ्यामध्ये एक तृतियांश होता. मात्र युक्रेनच्या बाजूने असलेल्या युरोपिय देशांना वायू पुरवठ्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे.
सध्या नॉर्ड स्ट्रीम प्रकल्प २० टक्के क्षमतेने सुरू आहे.दरम्यान रशिया वायूच्या किंमती वाढवण्यासाठी ही कपात अधिक काळपर्यंत सुरू ठेवू शकतो अशी भिती युरोपिय देशांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, युरोपियन संघानं रशियासोबत व्हिसा सुविधा करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यु्क्रेनमधील लष्करी कारवाईच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन नागरिकांना २७ राष्ट्रांच्या गटात प्रवेश करण्याच्या नियमांमध्ये कठोरता आणण्याच्या निर्णयाला संघानं संमती दर्शवली आहे.