मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांवर त्वरित निकाल लावण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्क्यापेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायासाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसंचं मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं आणि लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटतं असल्याचं उदय लळीत यांनी सांगितलं. वकील व्यवसायात सातत्याने स्वतःला विकसित करणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करीत राहणं हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केल असंल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश पूर्णपणे विकसित असावा अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून आपण सर्वांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत. या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.