नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या बैठकीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्बेकिस्तानच्या समरकंद इथं शांघाई सहयोग संघटनेच्या शिखर बैठकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी विशेष बैठकीत चर्चा केली होती. तेव्हा चालू स्थिती युद्धासाठी योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले की, युक्रेन संघर्षाबाबत भारताची भूमिका मला माहिती असून, शक्य तितक्या लवकर युद्ध समाप्त करण्याचा प्रयत्न करु. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनीही प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.