मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावरचं पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. त्यासाठी तिथं सुरू केल्या जात असलेल्या ४ – ई बस गाड्यांचं, तसंच बायोटॉयलेट सुविधेचं लोकार्पण आज पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यटन विकासाकरता सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे, वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावं यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. राज्य शासनानं महाबळेश्वरसाठी जे धोरण तयार केलं आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला वाव दिला जाईल, असं लोढा यांनी यावेळी सांगितलं. कास पठारावर पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी सुरू करणं, स्थानिकांना रोजगार वाढवण्यासाठी आराखडा तयार करणं, सुरक्षा वाढवणं, तसंच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.