नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकासाचे लाभ देशाच्या अतिदुर्गम भागात पोचावेत, यासाठी केंद्र सरकार गेली आठ वर्ष काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हिमाचल प्रदेशात बिलासपूर इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज ते आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा महोत्सवात सहभागी झाले. दसऱ्यानिमित्त भगवान रघुनाथजीच्या रथयात्रेला प्रारंभ होतो ज्यात ३०० हून अधिक देवी देवतांच्या दिंड्यां सामील होत असतात.

आज हिमाचल प्रदेशाच्या पारंपरिक वेशात प्रधानमंत्री या रथयात्रेत सहभागी झाले आणि त्यांनी असंख्य नागरिकांची मानवंदना स्वीकारली. यावेळी हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते. ढालपूर मैदानात सुरु असलेला हा महोत्सव ११ ऑक्टोबर पर्यंत चालेलय कुल्लू दसरा महोत्सवात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, प्रधानमंत्र्यांनी बिलासपूर इथं 3 हजार 650 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली.

कोहत्तीपुरा इथं एम्स रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. 247 एकरावर पसरलेल्या या रुग्णालयासाठी 1 हजार 470 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचं उद्धाटन त्यांनी केलं. मेडिकल डिव्हाईस पार्क, पिंजोर-नालागढ चारपदरी रस्ता आदि कामांचा त्यांनी प्रारंभ केला.