नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं.  काश्मीरमधे बारामुला इथं एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. मोदी सरकार फक्त जम्मूकाश्मीरच्या जनतेशी चर्चा करेल आणि काश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचं समूळ उच्चाटन केलं जाईल, असं ते म्हणाले.

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या तिन्ही पक्षांनी मिळून काश्मीरची दुर्दशा केली, असा आरोप त्यांनी केला. गेल्या ७५ वर्षांत या पक्षांनी मिळून केवळ १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काश्मीरमधे आणली तर मोदी सरकारने अल्पावधीत ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली, असं ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयं, क्लस्टर विद्यापीठं, जम्मू बारामुला रेल्वे, रस्तेविकास आणि कर्करोग रुग्णालयं या मुद्दयांवरही ते बोलले.