नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डांचं वितरण करण्याचा प्रारंभ गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. गुजरातमध्ये राज्यभरात पन्नास लाख आयुष्मान कार्डं लाभार्थ्यांच्या थेट घरापर्यंत पोचवण्यात येणार आहेत.गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदी यांनी २०१२ मध्ये मुख्यमंत्री अमृतम योजना सुरू केली होती. वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवणं गरीब नागरिकांना शक्य व्हावं असा या योजनेचा हेतू होता. २०१४ मध्ये ही योजना ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांपर्यंत आहे अशा कुटुंबांपर्यंत विस्तारण्यात आली. त्यानंतर या योजनेचा आणखी काही घटकांपर्यंत विस्तार करण्यात आला आणि तिचं नाव मुख्यमंत्री अमृतम वात्सल्य योजना असं ठेवण्यात आलं. या योजनेचा अनुभव लक्षात घेऊन २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना सुरू केली. ज्यामध्ये पात्र लाभार्थी कुटुंबाना दर वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाचं संरक्षण मिळतं. २०१९ मध्ये गुजरात सरकारनं मुख्यमंत्री अमृतम वात्सल्य योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्न केली.