मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार ७०० कोटी रुपयांची वाढीव दरानं मदत दिल्यानंतर आता ही मदत करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं या वेळी प्रथमच दिलासा देताना सुमारे ७५० कोटी रुपयांचं वाटप केलं. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठीही हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत. यासाठीचे पंचनामे वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी महसूल विभागाला दिले आहेत. दरम्यान, जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना सुमारे ४७०० कोटींची मदत करण्यात आली, असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागानं दिली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त आणि दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे. याशिवाय ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेत करायच्या कामांची शिफारस मंत्री मंडळाला करण्यासाठी एका उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. राजमाता जिजाऊ – बाल आरोग्य आणि पोषण अभियानाच्या चौथ्या टप्प्याला तसंच अमरावती जिल्ह्यातल्या सापन मध्यम प्रकल्पाच्या सुमारे ४९५ कोटी रुपये किंमतीच्या कामाला मान्यताही कालच्या बैठकीत देण्यात आली.