नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १५२ धावा केल्या. न्यूझीलंडच्या मिशेलनं ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकवून डावाला आकार दिला. उत्तरादाखल पाकिस्तानची सलामीची जोडी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. ४३ चेंडूत ५७ धावा करणाऱ्या रिझवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्यांसोबत रविवारी मेलबर्न इथं पाकिस्तानचा अंतिम मुकाबला होईल.