नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, चीनमधल्या वूहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं, जम्बो-७४७ हे एअर इंडियाचं पहिलं विशेष विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं. काल दुपारी हे विमान वूहानला रवाना झालं होतं.

या विमानात एकूण ३२४ प्रवासी आहेत. गरज भासली तर आज पुन्हा आणखी एक विशेष विमान वूहानला पाठवलं जाईल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात देखरेखीखाली असलेल्या बारापैकी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

इतर तीन जणांच्या नमून्यांचे तपासणी अहवाल आज येतील, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली.