नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.

ब्रेक्झिटच्या बाजूनं सार्वमत घेतल्यानंतर जवळपास ३ वर्षांनंतर ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपियन महासंघासोबत मैत्रीपूर्ण सहकार्य कायम ठेवण्याचं आश्वासन यावेळी दिलं. जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी आगामी वाटचालीत अनेक अडथळे असले तरी यशस्वी होणाऱ्या अनेक संधी असल्याचा आशावादही व्यक्त केला.

ब्रेक्झिट बाहेर पडण्याचा संक्रमण कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत आहे. तोपर्यंत युरोपियन महासंघाचे अनेक कायदे ब्रिटनमध्ये लागू राहतील तसंच युरोपियन महासंघामधल्या देशांत नागरिकांना मुक्तसंचार करता येईल.