पुणे : तंबाखूमुक्तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्यात यावी,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
31 मे पासून तंबाखू नकार सप्ताह सुरु करण्यात येत आहे. या निमित्ताने शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिका-यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्याचे आवाहन श्री. काळे यांनी केले. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तंबाखू नकार सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करावी, शहरातील जाहिरात फलकांवर, शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे फलक लावण्यात यावेत, निवासी सोसायट्या तंबाखूमुकत घोषित करण्याबाबत पुढाकार घ्यावा,असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्वय डॉ. राहूल मणियार यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सांगितली. गेल्या वर्षी या कार्यक्रमांतर्गत एकूण 88 प्रशिक्षण घेण्यात आले त्यामध्ये 7299 प्रशिक्षणार्थींना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात आली. या कालावधीत 1504 लोकांवर कार्यवाही करण्यात येऊन 3 लाख 44 हजार 165 रुपये एवढी रक्कम दंड स्वरुपात जमा करण्यात आली. या शिवाय अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात 1 कोटी 24 लाख 96 हजार 148 रुपये किंमतीचा गुटखा तर ग्रामीण पोलीस विभागाच्यावतीने 30 लाख 85 हजार 410 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस दिलीप करंजखेले, जीवन माने, अनिता वाघचौरे,बीके भाग्यश्री, बीके दशरथभाई, बीके पार्थभाई, मुकूंद अयाचित,दीपक माळी, ज्योती ढमाळ, मदन व्हावळ, जयश्री डोंगरे,अपर्णा शेंडकर, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.