मुंबई : लम्पी हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य चर्मरोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळत असून, राज्यात लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री.सिंह म्हणाले की, लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

राज्यामध्ये आजअखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3712 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 292205 बाधित पशुधनापैकी एकूण 2,14,071 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19,895 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 7,594 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी  रु. 19.57 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 138.20 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे 98.77 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.