मुंबई : पाटण तालुक्यातील काळोली येथे बाळासाहेब देसाई अद्ययावत बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
आज मंत्रालयात पाटण तालुक्यातील काळोली येथे होणाऱ्या बाळासाहेब देसाई अद्ययावत कृषी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकाम कामकाजाबाबत आढावा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.
प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या बांधकामाबाबत निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी मंत्री देसाई यांनी दिल्या. या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे काम दर्जेदार व उत्कृष्ट झाले पाहिजे तसेच बांधकाम प्रक्रिया तात्काळ सुरुवात करावी, अशाही सूचना मंत्री देसाई यांनी संबंधितांना दिल्या.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. नवघरे, अवर सचिव श्री. चिवटे, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यकारी अभियंता श्री. सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी श. ना. माळी उपस्थित होते.