मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील, यावर भर दिला जात आहे. एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बस गाड्या बस स्थानकं आणि स्वच्छता ग्रहांच्या स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश महामंडळाच्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एसटी आगार निहाय स्वच्छतेचं नियोजन करताना महामंडळाचे स्वच्छता सेवक ज्या ठिकाणी नाहीत, तिथे कंत्राटी स्वच्छता सेवकांची नेमणूक करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.