चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली. बंगळुरू येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सोबतच चांद्रयानने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
येत्या 7 सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. यापुढचा महत्वाचा टप्पा 2 सप्टेंबरला असेल ज्यावेळी लॅण्डर ऑर्बिटरमधून वेगळे होईल. ही पूर्ण प्रक्रिया यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांद्रयान-2 ला आणखी चार परीक्षांना सामोरे जायचे आहे. त्यातली एक उद्या, त्यापाठोपाठ 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी असेल असेही ते म्हणाले. इस्रोचे हे दुसरे चांद्रयान अभियान आहे. 22 जुलैला चांद्रयान श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावले. त्यात एक ऑर्बिटर, विक्रम हे लॅण्डर आणि प्रग्यान हे रोव्हर आहे.