पुणे  :   समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्सवांच्या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांच्या सहभागामुळे त्या उत्सवामध्ये सुसंस्कृतपणा वाढेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा -2018 च्या पारितोषीक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.गिरिष बापट, महापौर मुक्ता टिळक, आ. माधुरीताई मिसाळ, योगेश टिळेकर, नगरसेवक हेमंत रासने,  प्रविण चोरबेले, गणेश बिडकर, अजय  खेडेकर, माजी महापौर अंकुश काकडे,  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले, लोकमान्य टिळकांनी  जनतेला ब्रिटीशांच्या विरोधात  संघटीत  करता येईल, त्यांचे प्रबोधन करता येईल अशा विचाराने  पुण्यामध्ये गणपती उत्सवाची सुरुवात केली.  याच हेतूने आता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक मंडळे  सामाजिक प्रबोधनाचे देखावे सादर करीत असतात. त्यामुळे गणेशोत्सवामागील उद्देश पूर्ण होत असतो. या गणेशोत्सवामुळे त्या त्या भागातील कार्यकर्ते नागरिक एकत्र येतात, त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते. व सामाजिक प्रबोधनाचे कार्य होत असते. काही मंडळे वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवित असतात. अशा मंडळाचे कौतुक होणे आवश्यक आहे. आपापल्या भागातील अडचणी सोडविण्याकरीता अशा मंडळांनी वर्षभर प्रयत्न करावेत. त्यामुळे  विद्यार्थ्यांना, वृघ्दांना, महिलांना मदत मिळून पुणे शहरातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल. यावर भर दिला पाहिजे. डॉल्बीचा प्रश्न प्रबोधनाने सोडविण्याकरीता प्रयत्न करावेत. पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात असलेल्या अडीअडचणींबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही  त्यांनी सांगितले.  गणेशोत्सवामध्ये पावित्र्य राखून उत्सव साजरा करीत असल्याबाबत  तसेच  दगडूशेठ गणपती सार्वजनिक ट्रस्टमार्फत कोल्हापूर अथवा सांगलीमधील पूरग्रस्त भागातील गाव दत्तक घेण्याच्या व याकरीता 10 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार गिरिष बापट यांनी  गणेशोत्सव ही आता चळवळ झाली आहे. आणि आता अशा चळवळीची समाजाला गरज आहे. ज्यातून सर्वच घटकांचे प्रबोधन होते.  या गणेशोत्सवामध्ये कार्यकर्त्यांना उत्तेजन देण्याकरीता स्पर्धांचे आयोजन  करण्यात यावे, असे सांगितले. महापौर मुक्ता टिळक, आ.माधुरीताई मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली..

या स्पर्धेमध्ये एकूण 156 मंडळाचा सहभाग होता. त्यापैकी 98 मंडळे बक्षीसपात्र ठरली होती. यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषीक काळभैरवनाथ तरूण मंडळ, द्वितीय पारितोषीक महाराष्ट्र तरूण मंडळ, तृतीय पारितोषीक श्रीकृष्ण तरुण मंडळ, चौथे पारितोषीक वीर शिवराय तरुण मंडळ आणि पाचवे पारितोषीक संयुक्त प्रसाद  मित्र मंडळाला मिळाले. तसेच  हिंद तरुण मंडळ,कॅम्प, अरणेश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ यांना जय गणेश भुषण प्राप्त मंडळाचे पारितोषीक देण्यात आली.