नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील सहकारी आणि मान्यवर…
साधारणपणे असा अनुभव असतो की, जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होते तेव्हा खासदारांना राहण्याची काहीही सोय नसते. दीर्घकाळ त्यांना हॉटेल्समध्ये वास्तव्य करावे लागते आणि जसजसे त्यांच्यासाठी असलेली घरे रिकामी होत जातात तसं त्या घरांची दुरुस्ती आणि इतर व्यवस्था यात वेळ जातो. हे चक्र असेच सुरू राहते. हे चक्र थांबवण्यासाठी खासदारांच्या निवासाची एक सुयोग्य व्यवस्था कशी विकसित करावी आणि बदलत्या काळानुसार त्यात कुठल्या सुविधा असाव्यात याचा विचार केला गेला. खासदारांना स्वत:साठी तर एका खोलीपेक्षा जास्त गरज नसते मात्र त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचे काम असते ते म्हणजे त्यांच्या मतदार संघातून त्यांना भेटायला येणाऱ्या विविध नागरिकांची व्यवस्था करणे. अनेक लोक दूरदूरून खासदारांना भेटायला येतात आणि त्यांच्या मनात एकच इच्छा असते की, माझी रात्री राहण्याची व्यवस्था येथे व्हावी. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वांना माहित असते की, अशा गरजू लोकांना आपल्याला नकार देता येत नाही.
आता या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय करावे याचे अनुभव घेणे अतिशय कठीण आहे. खासदाराला स्वत:लाच माहिती असते की अशा लोकांची व्यवस्था करणे किती कठीण आहे. मात्र, याचा आम्ही गेल्या अधिवेशनातच सुयोग्य विचार करून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. आणखी एक अनुभव असाही आला की, काही निवासस्थानं खूप जुनी झाली आहेत आणि काळानुसार त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे त्या निवासस्थानांमध्येही नागरिकांची व्यवस्था केली जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही काळातच आणखी काही निवासस्थानांचं काम लवकरच पूर्ण होईल. सरकार आपल्याच विभागातल्या निवासस्थानांचं काम इतक्या उत्तम प्रकारे पूर्ण करत असेल तर बाहेरच्या लोकांना आश्चर्य वाटतं की आतलं काम देखील उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी हे काम पूर्ण केले अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. साधारणपणे असा समज असतो की सरकारी काम कायम उशिरानं होतं. लोक नेहमी विचारतात किती उशीरापर्यंत चालणार आहे? केव्हा पूर्ण होणार आहे? मात्र, हे काम वेळे आधीच पूर्ण झालं आहे. आणखी एक म्हणजे सरकारी काम असेल तर लोक गृहीत धरतात की, कामाचे बजट वाढतच जाणार आहे. येथे आणखी एक विशेष बाब म्हणजे कामाच्या गुणवत्तेशी काहीही तडजोड न करता ठरलेल्या बजेटपेक्षा कमी खर्चात हे काम पूर्ण करण्यात आले. म्हणजे वेळेची बचत झाली, पैशांची बचत झाली आणि सोयीसुविधा देण्यात विशेष काळजी घेतली गेली, असे भवन निर्माण करण्यात ज्या ज्या सहकाऱ्यांनी योगदान दिले आहे, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केले या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे.
यावेळी आपण बघितले असेल की संसदेत अत्यंत उत्तम पद्धतीने काम झाले. आणि त्याचे श्रेय सर्व राजकीय पक्षांना, सर्व खासदारांना आणि सभापतीपदी बसणाऱ्या सर्व मान्यवरांनाही जाते. मात्र, अधिवेशन संपतासंपताच एक मागणी आली होती. लोकसभेत सभापती आणि राज्यसभेत उपराष्ट्रपतींनी हा विषय काढला होता की, 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत या निमित्त आपल्या संसदेचे चित्रही जरा बदलायला हवे.
ही गोष्ट तर खरीच आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून मी अनेकदा खासदार आणि प्रसार माध्यमातल्या मित्रांकडूनही ही मागणी ऐकली आहे. संसद भवन आता जुने झाले आहे त्यात काही बदल करायला हवेत, काही आधुनिक व्यवस्था विकसित करायला हव्यात. तेव्हा संसदेने ही मागणी केली आहे तेव्हा सरकारने निश्चितच त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. याच संसद भवनात आतल्या व्यवस्थांना आधुनिक करता येईल का? किंवा काही बदल करता येतील का? यावर अधिकारी विचार करीत आहेत. मी त्यांना आग्रह केला आहे की, जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर हे काम सुरू करावे म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्याला हे काम पूर्ण करायचे असेल तर आपल्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. मात्र, आपल्याला प्रयत्न करायला हवेत.
या नव्या व्यवस्थांसाठी मी सर्व खासदारांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांनी यासाठी काहीना काही मदत केली आहे त्यांचेही मी आभार मानतो.