नवी दिल्ली : यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर तीन ज्‍येष्ठ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राष्‍ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन संस्थांना मिळाले आहेत. तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने यंदा मौलाना अबूल कलाम आझाद चषक जिंकला आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात येते. तर विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चार वर्षातून एकदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या विविध क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली जाते. क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरवले जाते. तर विविध खेळांना प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना (खासगी आणि सरकारी दोन्ही) राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो. क्रीडा क्षेत्राचा विकास आणि कल्याणसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना देखील हा पुरस्कार दिला जातो. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांना मौलाना अबूल कलाम आझाद चषक दिला जातो.

2019 च्या क्रीडा पुरस्कारांसाठी अनेक नामांकने आली होती. या नामांकनांमधून निवड समितीने सर्व विजेत्यांची नावे निश्चित केली. न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या निवड समितीत माजी अर्जुन पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, क्रीडा अभ्यासक आणि पत्रकारांचा समावेश होता. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार सरकारने आज क्रीडा पुरस्कार जाहीर केले.