मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल असे सांगितले. पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.