नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाचं प्रकरण आणि एका शीख मुलीचं अपहरण करुन सक्तीनं धर्मांतर आणि लग्न केल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे.

पाकिस्तान सरकारनं टाळाटाळ करणं सोडून, या प्रकरणातल्या गुन्हेगारांना त्यांच्या घृणास्पद कृत्यांसाठी कडक शासन करावं, असं आवाहन भारतानं केलं आहे. इतर देशांना उपदेश करण्याऐवजी पाकिस्तान सरकारनं आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कृती करावी, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.