पिंपरी : थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांनी वयाच्या २१ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील धगधगणारी क्रांतीची मशाल अधिक प्रज्वलीत झाली असे प्रतिपादन सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड,  कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, उप अभियंता बाळासाहेब शेटे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ट अभियंता पल्लवी सासे, दिपाली धेंडे, दूरध्वनी चालक विमल कांबळे, कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ आदी उपस्थित होते.

थोर क्रांतिकारी बाबू गेनू यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्य होते. स्वातंत्र्याच्या ध्यासाने व देशभक्तीने  प्रेरित झालेले बाबू गेनू हे परदेशी मालाचा भारतात  वापर होऊ नये यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई येथून  १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी माल ट्रकमधून विक्रीसाठी पाठवला जात असताना त्यांनी तो अडवून त्यास प्रतिबंध केला. त्यावेळी ब्रिटीश अधिकाऱ्यानी चालविलेल्या ट्रकखाली बाबू गेनू शहीद झाले, त्यांच्या प्रखर देशभक्तीस उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांच्याप्रती स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली.