आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

पिंपरी : पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया गोसावी मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास करण्यासाठी निधी मिळावा यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून मोरया गोसावी मंदिर परिसराच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. आता पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

मोरया गोसावी महाराज यांनी चिंचवडगावातील पवना नदीकाठी संजीवन समाधी घेतली. ते १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्रीगणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. मोरया गोसावी महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे. मोरया गोसावी मंदिर हे पिंपरी-चिंचवडकरांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोरया गोसावी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

राज्य सरकारच्या संबंधित विविध विभागाकडे पत्रव्यवहार करून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्याचप्रमाणे विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून मोरया गोसावी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा याकडे त्या त्या वेळच्या राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित करून मंदिर व मंगलमूर्ती वाडा परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे, पादुका मंदिर, संभामंडप व संरक्षण भिंत उभारण्यात यावे, मुख्य प्रवेशद्वाराचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या दर्जामध्ये वाढ करावी, मंदिर परिसरातील पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, भक्तांसाठी स्वच्छ व पुरेसे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टाकी उभारावी, स्वच्छतागृह उभारावे, समाधी मंदिर सभोवतीच्या पटांगणामध्ये दगडी पायऱ्यांचे बांधकाम करावे, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, भक्तनिवास, वेदपाठ शाळा तसेच भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात यावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी सरकारकडे केली होती.

आमदार जगताप यांच्या सततच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी बोलताना मोरया गोसावी मंदिर परिसराला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी तातडीने यावर्षीचा निधी तातडीने देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यश आल्याचे त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे मोरया गोसावी मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याबद्दल आमदार जगताप यांनी पालकमंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत.